शेततळ्यात अंघोळीसाठी उतरलेल्या सख्ख्या दोन भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !
जळगाव टुडे । आई वडिलांचा डोळा चुकवून शेतातील तळ्यात अंघोळीसाठी उतरलेल्या सख्ख्या दोन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना आज बुधवारी (ता.29) घडली. प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले असे दोघे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. गोपाळ जयराम ढेपले यांची ती मुले होती. (Nashik News)
नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील नांदुर्डी रस्त्यावरील असलेल्या ढेपले वस्तीवर सदरची घटना घडली आहे. विहिरीवरील इलेक्ट्रिक पंप सुरू करण्यासाठी घरच्यांनी प्रेम आणि प्रतीक यांना पाठवले होते. बराच वेळ झाला तरी दोन्ही भाऊ पंप सुरू करून परत आले नाही. त्यामुळे चिंता वाटू लागल्याने त्यांचा तपास करण्यासाठी घरातील लोक त्यांना शोधण्यासाठी विहिरीकडे गेले. मात्र, त्याठिकाणी त्यांचा कुठेच पत्ता नव्हता. सगळीकडे शोध घेतल्यावर जवळच्या शेततळ्याजवळ मुलांचे कपडे त्यांना आढळले. त्यामुळे दोन्ही मुले पाण्यात बुडाल्याची शंका बळावली. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. दोन्ही सख्ख्या भावांची प्राणज्योत मालवली होती.
दुर्घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली तसेच हळहळ देखील व्यक्त करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.