दोघे सख्खे भाऊ वानरांना हाकलण्यासाठी गेले आणि शेततळ्यात बुडून मरण पावले

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडलेली हृदयद्रावक घटना
Nashik News : नाशिक जिल्ह्यात खामखेडा (ता.देवळा) येथील बुटेश्वर शिवारात वानरांना हाकलून लावण्यासाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या भावांचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना बुधवारी (ता.20) दुपारी तीनच्या सुमारास घडली. शेतकरी गणेश संतोष आहेर यांची ती मुले होती.

खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुले तेजस आहेर (वय 12) व मानव आहेर (वय 8) हे बुधवारी सकाळची शाळा करून घरी परतले होते. त्यानंतर दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आई वडिलांना मदत करण्यासाठी ते शेतात आले. साधारण तीन वाजेची वेळ असेल. त्याच सुमारास जंगलातून शेतात आलेल्या वानरांना हुसकावून लावण्यासाठी दोघे भाऊ त्यांच्या पाठीमागे गेले. काही वेळाने वानर हाकलून लावल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात दोघेजण पाणी पाहायला गेले. तेव्हा मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी लहान भाऊ मानव याने प्रसंगावधान राखून मोठ्या भावाचा हात धरला. मात्र तो देखील त्याच्यासोबत शेततळ्याच्या पाण्यात पडला. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेताकडे पळत येऊन तिच्या काकांना घडलेली घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे लागलीच धाव घेतली. मात्र, शेततळे पाण्याने अर्धे भरलेले असल्याने तोपर्यंत दोन्ही भावांचा बुडून मृत्यू झाला होता. दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खामखेडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button