चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया’ आघाडीचा घेतला समाचार
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी (ता.08) चंद्रपूर येथे राज्यातील पहिलीच प्रचार सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ‘इंडिया’ आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात विकासाचा कोणताही प्रकल्प आला तर आधी कमिशन मागतात, नाहीतर कामाला ब्रेक लावू असे धोरण अवलंबले जाते, असा आरोप त्यांनी विरोधी पक्षांवर जाहीरपणे केला.
राज्यात कोणताही मोठा नवीन प्रकल्प आल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आधी कमिशन मागितले. त्यांनीच जलयुक्त शिवार योजना बंद केली. विदर्भातील विकासासाठी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मी केले त्याचाही विरोध या लोकांनी केला होता. मुंबई मेट्रो, कोकणातील रिफायनरीही रोखली. पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पाठवले तरी कमिशनसाठी गोरगरिबांना घरे देण्यापासून रोखले. आमचे सरकार येताच आम्ही सर्व योजनांना पुन्हा गती दिली. रात्रंदिवस हे सरकार काम करतेय. हेतू स्वच्छ असला की निकालही चांगला असतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवले.
यंदाची लोकसभा निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरतेची निवडणूक आहे. एकीकडे भाजपाची एनडीए आघाडी आहे, ज्यांचे ध्येय देशासाठी मोठे निर्णय घेणे आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे. ज्याठिकाणी सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खायची हा त्यांचा हेतू आहे. इंडिया आघाडीने देशाला नेहमी अस्थिरतेकडे नेले. स्थिर सरकार का गरजेचे असते हे महाराष्ट्राहून चांगलं कुणास ठाऊक असेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.