शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते- प्रधानमंत्री मोदी
Narendra Modi : केंद्रात युपीएचे सरकार सत्तेवर असताना, महाराष्ट्रातील कृषिमंत्री होते. त्याकाळी दिल्लीतून पॅकेज जाहीर व्हायचे मात्र भ्रष्ट सरकारमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते, असे बोलून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले तसेच तत्कालिन युपीए सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा, अशा घोषणा देऊन त्यांनी भाषणाला मराठीत सुरुवात केली आणि उपस्थित जनसमुदाची मने जिंकली. आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे. गरीब , युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे व सातत्याने होत राहील, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले.
आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते. मोदी म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला आलो तेव्हा तुम्ही NDA ला 300 पार केले. 2019 मध्ये आलो तेव्हा तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही NDA ला 350 पार पोहोचवले. आणि आता 2024 मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार. संपूर्ण विदर्भात ज्या पद्धतीचं प्रेम मिळत आहे, ते पाहता हे निश्चित आहे यंदा एनडीए 400 पार जाणार असा मला विश्वास आहे.