पंतप्रधानांच्या हस्ते सावदा आणि किनगाव ग्रामीण रुग्णालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे रविवारी लोकार्पण
Narendra Modi : जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा (ता. रावेर) तसेच किनगाव (ता. यावल) उभारलेले ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतींचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. 25 फेब्रुवारी) होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
सावदा येथे 30 खाटांचे ग्रामीण रुणालय सन 2019/20 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते. सदर ग्रामीण रुग्णालयाची इमारत 30 खाटांची असून दोन मजली आहे. त्यात तळमल्याचे क्षेत्रफळ 18000 चौरस फुट एवढे आहे. पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ 11,300 चौरस फुट, असे एकुण 29,300 चौरस फुटाची इमारत आहे. त्याठिकाणी तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड, एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत. अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण 24 असुन वर्ग-1 चे एक, वर्ग-2 चे तीन, वर्ग-3 चे आठ व वर्ग-4 चे 12 निवासस्थान आहे.
किनगाव ता. यावल येथे नविन 30 खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन 2018/19 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते. या इमारतीचे तळमल्याचे क्षेत्रफळ 13,250 चौरस फुट एवढे आहे. पहिल्या मजल्याचे क्षे. 13,250 चौरस फुट असे एकुण 26,500 चौरस फुटाची इमारत आहे. तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग, आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण 12 असून वर्ग-2 चे चार, वर्ग-3 चे आठ निवासस्थान आहे.