मोदी 3.0 मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ कोटी रूपये ?
जळगाव टुडे | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारमधील सर्व मंत्र्यांना सोमवारी खाते वाटप करण्यात आले. त्यानंतर लगेचच केंद्रीय वित्तमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार विविध राज्यांना सुमारे 2 लाख कोटी 79 हजार 500 कोटी रूपयांचा कर वाटप करण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश तसेच बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला मात्र कमी पैसा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (Narendra Modi)
केंद्र सरकारच्या नवीन खाते वाटपात निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालय आले आहे. त्यांनीच निर्णय घेतल्यानंतर आता जून 2024 साठीच्या कर वितरणातील नियमित रिलिज रकमेशिवाय राज्यांना अतिरिक्त हप्ता वितरीत केला जाणार आहे, जो सुमारे 01 लाख 39 हजार 750 कोटी रूपये इतका आहे. तसेच सन 2024/25 या आर्थिक वर्षासाठी राज्यांना वितरीत केलेल्या रकमेसह 10 जून 2024 पर्यंत एकूण 02 लाख 79 हजार 500 कोटी रूपयांचे कर वाटप करण्यात आले आहे.
कोणत्या राज्याला किती रूपये मिळाले ?
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारकडून वितरीत झालेल्या कर निधीच्या नवीन हप्त्यातून उत्तर प्रदेशला सर्वाधिक 25 हजार 69 कोटी रूपये मिळाले आहेत. त्यानंतर बिहारला 14 हजार 56 कोटी रूपये, मध्य प्रदेशला 10 हजार 970 कोटी रूपये, महाराष्ट्राला 8 हजार 828 कोटी रूपये, गुजरातला 4 हजार 860 कोटी रूपये, आंध्र प्रदेशला 5 हजार 655 कोटी रूपये, आसामला 4 हजार 371 कोटी रूपये, छत्तीसगडला 4 हजार 761 कोटी रूपये मिळाले आहेत.