नवीन मंत्रिमंडळात समावेश…महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना येऊन गेले फोन !
जळगाव टुडे | नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी (ता.09) सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 40 मत्र्यांचा देखील समावेश असणार आहे. दरम्यान, मोंदीसोबत शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी आधीच तयार झाली असून, त्यातील खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन देखील येऊन गेले आहेत. महाराष्ट्रातूनही काही खासदारांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे आणि त्यांना फोन सुद्धा करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरमधून विजयी झालेले नितीन गडकरी यांचे केंद्रातील मंत्रिपद निश्चित आहे. यावेळी तिसऱ्यांदा ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सहभागी होणार आहे. अर्थातच, एनडीएकडून गडकरींना त्यासाठीचा पहिला फोन येऊन गेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील रामदास आठवले, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन येऊन गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मात्र अजुनपर्यंत कोणताच फोन आला नसल्याचे सांगितले जात आहे.
रक्षा खडसेंना मंत्रिपदाचा बहुमान ?
दरम्यान, रावेरमधून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदा वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. उत्तर महाराष्ट्रात यावेळी महायुतीच्या फक्त दोनच जागा आल्या असून, त्यात रक्षा खडसे देखील आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून महिला खासदाराला मंत्रिपद देण्याचा विचार होत असताना, रक्षा खडसे यांची वर्णी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता बळावली आहे.