शेतकरी म्हटले कांद्यावर बोला…अखेर नरेंद्र मोदींना कांद्यावर बोलावेच लागले !
जळगाव टुडे । नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोदी दुसरे काही बोलणार तेवढ्यातच समोर बसलेल्या शेतकऱ्यांनी ‘कांद्यावर बोला’ अशी घोषणा करण्यास सुरूवात केली. अखेर त्यामुळे मोदींना त्याठिकाणच्या सभेत कांद्यावर बोलावेच लागले. तेव्हा कुठे शेतकऱ्यांचे समाधान झाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आमच्या कार्यकाळात कांदा निर्यात 35 टक्क्यांनी वाढली आहे. ऑपरेशन ग्रीनद्वारे सरकार कांदा उत्पादकांना सबसीडी देखील देत आहे. नाशिक आणि परिसर कांदा आणि द्राक्ष शेतीसाठी ओळखला जातो. आमच्या सरकारने पहिल्यांदा कांद्याचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही गेल्या हंगामात सुमारे 7 लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे. आताही सरकार पुन्हा 5 लाख मेट्रिक टन कांदा साठा करण्याच्या तयारीत आहे.”
“एनडीए सरकारच्या कालावधीमध्ये कांद्याची निर्यात जवळपास 35 टक्क्यांनी वाढली आहे. आता दहा दिवसांपूर्वीच कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल 22 हजार पेक्षा अधिक मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे,” असेही मोदी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले.