पंतप्रधान मोदींच्या नावावर घर, जमीन, कोणतेही वाहन नाही; मात्र तीन कोटींची संपत्ती

जळगाव टुडे । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मोदी यांच्या नावावर सध्याच्या परिस्थितीत कोणतेही घर, जमीन अथवा वाहन असल्याची नोंद नाही. मात्र, त्यांच्याकडे सुमारे 03 कोटी 02 लाख रूपयांची संपत्ती असल्याचे निदर्शनास आले आहे.

मोदींनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची पत्नी जशोदाबेन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडील संपत्तीबाबत आणि उत्पन्नाबाबत ‘माहिती नाही’, असे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. मोदींवर कोणतेही कर्ज नाही तसेच कर्जाची थकबाकी देखील नाही अथवा कोणतेही फौजदारी प्रकरण प्रलंबित नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून मिळणारे वेतन आणि बँकेतील ठेवींवरील व्याज हाच त्यांच्या नियमित उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. मोदींच्या नावावर घर, जमीन अथवा कोणतेही वाहन नसल्याचे म्हटले आहे.

मोंदीकडे आहेत चार सोन्याच्या अंगठ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुमारे 2,85,60,338 रूपयांच्या मुदत ठेवी आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 52,920 रूपयांची रोख रक्कम आहे. बँक खाते क्रमांक एकमध्ये त्यांची 73,304 रूपयांची बचत असून, बँक खाते क्रमांक दोनमध्ये त्यांची 7 हजार रूपयांची बचत आहे. तसेच राष्ट्रीय बचतपत्रामध्ये त्यांनी 9,12,398 रूपये गुंतविले आहेत. मोदींकडे 02 लाख 68 हजार रूपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या देखील आहेत. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या शिक्षणाचाही उल्लेख आहे. त्यानुसार त्यांची इयत्ता दहावी गुजरात शिक्षण मंडळात झाली असून, त्यांनी बी.ए. दिल्ली विद्यापीठातून तर एम.ए. गुजरात विद्यापीठातून पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button