नंदुरबारमधील चौधरींच्या चहाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली आठवण !
जळगाव टुडे । “नंदुरबार आणि गुजरात यांचा खूप जवळचा संबंध राहीला आहे. पंतप्रधान होण्याआधी मी स्वतः अनेकवेळा नंदुरबार येथे येत होतो. नंदुरबारला आलो आणि चौधरींकडील प्रसिद्ध चहा घेतली नाही, असे कधीच झाले नाही. तुमचा चहा आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे कर्ज हा नरेंद्र मोदी कधीही विसरू शकत नाही,” अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केली.
महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना मोदींनी नंदुरबारमधील चौधरींच्या चहाची आठवण ताजी केली. आपण जेव्हाही नंदुरबारमध्ये आलो, तेव्हा चौधरींचा चहा पिल्याशिवाय गेलो नाही, असेही मोदी सभेतील भाषणात म्हणाले.
दरम्यान, ज्या नागरिकांना अद्याप स्वतःचे घर मिळालेले नाही, ज्या नागरिकांच्या नळाला अद्याप पाणी आलेले नाही. ज्या नागरिकांना अद्याप गॅस कनेक्शन मिळालेले नाही, त्या नागरिकांना सांगा की, पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना घर, गॅस कनेक्शन, वीज आणि पाणीपुरवठा नरेंद्र मोदी देणार ही गॅरंटी आहे, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मतदारांना दिली. तिसऱ्या कार्यकाळामध्ये आपण तीन कोटी घर बांधणार असल्याचा दावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. तसेच वंचित आणि आदिवासी जनतेची सेवा ही माझ्यासाठी परिवारातील सदस्यांच्या सेवेप्रमाणे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.