‘उबाठा’ म्हटलं की उलटी आल्यासारखे वाटते, त्यांनीच महाराष्ट्राची लाज घालवली

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Jalgaon Today : ”उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखे वाटते. उद्धव ठाकरे विकृत माणूस आहे. दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहवत नाही. चाळीस वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. त्यांनीच महाराष्ट्राची लाज घालवली”, अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राणेंच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यात बोलताना राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.

”मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नसल्यामुळे त्यांची आठवण येते. पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली. मनसेची सभा आणि उबाठा गटाची सभा हा योगायोग आहे. मनसे आणि माझे जवळचे संबंध आहेत. मला मत म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीचे मत आहे. चांगल्याला चांगलं म्हणायची वृत्ती फक्त राज ठाकरेंकडे आहे”, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.

“उद्धव ठाकरेंसारखे विचारवंत सभेत काय बोलतात हे पाहण्यासाठी कार्यकर्ता पाठवला होता. सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली. खोके खोके बोलता तर मी मातोश्रीवर बोके सोडलेले नाहीत. माझ्या एवढे मातोश्री कोणाला माहिती देखील नाही. वेळ आली तर सगळं काढेन”, असा इशारा सुद्धा नारायण राणेंनी यावेळी दिला. “मनसैनिक आणि माझ्यात काही फरक मानत नाही. भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांच्यासोबत माझे संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत”, असेही राणे म्हणाले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button