राजस्थानात वीरमरण; शहादा तालुक्यातील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

जळगाव टुडे । राजस्थानमधील अजमेर येथे वीरमरण प्राप्त झालेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील जवानावर आज बुधवारी (ता.12) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर रमेश सजन वसावे यांचे असे त्यांचे नाव असून, मंदाणे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वसलेल्या घोडलेपाडा या आदिवासी लोकवस्तीचे ते रहिवासी होते. भिलवाडा येथे दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा दोन सोमवारी मृत्यू झाला होता.
(Nandurbar News)

मेजर रमेश वसावे यांना सोमवारी (ता.10) राजस्थानात कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात वीरमरण प्राप्त झाले होते. सन 2005 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झालेले जवान वसावे यांना जम्मू आणि काश्मिरमध्ये पहिली नेमणूक मिळाली होती. त्यानंतर दिल्ली तसेच चंदीगड, झारखंड येथे त्यांनी कर्तव्य बजावले होते. सध्या भिलवाडा येथे नेमणूक असताना, त्यांची झारखंडमध्ये पुन्हा बदली झाली होती. तत्पूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आज बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह जन्मगावी घोडलेपाडा येथे पोहोचला. सीआरपीएफच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत त्यांना अखेरची मानवंदना दिली. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी शहाद्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक, नंदुरबारचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपस्थित होते.

मेजर वसावे यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, दोनभाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. भावाच्या एका मुलीला त्यांनी दत्तक देखील घेतले आहे. त्यांचा एक मुलगा नंदुरबार येथे तर दुसरा मुलगा शहादा येथे माध्यमिक शिक्षण घेत आहे. त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे माहिती पडताच नंदुरबार जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button