Mumbai News : आईच्या मृतदेहाजवळ मुलगा दोन दिवस बसून राहिला; शेजाऱ्यांना दुर्गंधी आली तेव्हा कळलं !
Mumbai News : कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील धक्कादायक प्रकार म्हणजे तिच्या १४ वर्षीय मुलाला आईच्या मृत्यूची कल्पनाच नव्हती. शेजाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने संशय आला. त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि हृदयद्रावक परिस्थितीचा उलगडा झाला. १४ वर्षीय मुलगा आपल्या आईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस एकसारखा बसून होता.
Mumbai News : Son sat near mother’s dead body for two days; Neighbors knew when it smelled bad!
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यूचे कारण नैसर्गिक असू शकते, परंतु अधिकृत अहवाल आणि पोस्टमॉर्टेमच्या तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. खडकपाडा येथील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सेल्विया डेनीयल (४४) यांच्या अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. सेल्विया त्यांच्या पती डेंनीयल आणि १४ वर्षीय मुलगा ऑलविन यांच्यासोबत राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी डेंनीयल कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि त्या काळात सेल्विया आणि ऑलविन घरात एकटे होते.
शवविच्छेदन अहवालानंतरच आईच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल
सेल्विया झोपेत असताना अचानक त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेची माहिती कोणालाही कळाली नाही. १४ वर्षीय ऑलविनला आईच्या मृत्यूची कल्पनाच नव्हती आणि तो दोन दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. दोन दिवसानंतर घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. त्यांनी घराचे दार ठोठावले, परंतु आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी खडकपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घरात प्रवेश केला आणि हृदयद्रावक दृश्य पाहिले. पोलिसांनी मुलाची प्राथमिक विचारपूस केली असता, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लक्षात आले. मुलाने पोलिसांना काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तो फक्त आपल्या आईकडे बघत होता. गेल्या दोन दिवसांपासून तो आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.