घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी दोघांचे मृतदेह सापडले..!
मृतांची एकूण संख्या झाली 16
जळगाव टुडे । मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी कोसळलेल्या भव्य होर्डिंगखाली सापडून यापूर्वी 14 जणांचा मृत्यू होऊन सुमारे 75 जण गंभीर जखमी झाल्याचे उघडकीस आले होते. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री आणखी दोघांचे मृतदेह होर्डिंगच्या ढिगाऱ्याच्या खाली सापडले असून, मृतांची संख्या आता 16 झाली आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत संबंधित कंपनीचा मालक आणि रेल्वे प्राधिकरणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News)
घाटकोपर येथे रेल्वे खात्याच्या मालकीच्या मैदानावर 04 होर्डिंग होते. त्यापैकी सोमवारी कोसळलेले 120 बाय 120 चौरस फुटी होर्डिंग बेकायदा होते. वर्षभरापूर्वी ते काढून टाकण्यास सांगण्यात आले. मात्र, रेल्वेने परवानगी दिल्याने ते पुन्हा उभे राहिले आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने 16 जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरले. दुसरीकडे बेकायदेशीरपणे जाहिरात होर्डिंग्ज लावणाऱ्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीचा मालक भावेश भिंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर तो फरार झाला आहे.
भावेश भिंडे याच्यावर यापूर्वी देखील 23 गुन्हे दाखल आहेत. भावेशला या वर्षी जानेवारी महिन्यात एका बलात्कार प्रकरणातही अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याला जामीन मिळाला. सन 2009 मध्ये त्याने विधानसभा निवडणूकही लढवली होती. बेकायदेशीर होर्डिंग्ज बसवण्याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर रेल्वेने 2017-18 मध्ये भावेशच्या आणखी एका कंपनीला काळ्या यादीत टाकले होते.