मुंबईतील घाटकोपरमध्ये कोसळलेल्या भव्य होर्डिंगखाली सापडून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू…!
जळगाव टुडे । मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी कोसळलेल्या भव्य होर्डिंगखाली सापडून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू होऊन सुमारे 75 जण गंभीर जखमी झाल्याचे उघडकीस आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News)
घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख देण्याचे जाहीर केले असून, जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील. तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सदरच्या होर्डिंगचे वजन सुमारे 250 टन असल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्याची जबाबदारी घेतल्यानंतर बचावकार्यासाठी 67 जणांची टीम तैनात करण्यात आली होती. बचावकार्य सोमवारी रात्रभर सुरूच होते. सकाळी आणखी मृतांचा आकडा वाढला आहे.
रेल्वे खात्याच्या मालकीच्या मैदानावर 04 होर्डिंग होते. त्यापैकी कोसळलेले 120 बाय 120 चौरस फुटी होर्डिंग बेकायदा होते. वर्षभरापूर्वी ते काढून टाकण्यास सांगण्यात आले. मात्र, रेल्वेने परवानगी दिल्याने ते पुन्हा उभे राहिले, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.