जालन्याचे उद्योगपती संजय सिनगारे यांच्या कंपनीशी खासदार उन्मेश पाटील यांचा संबंध काय ?
कंपनीचे संचालक प्रशांत वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला सवाल
MP Unmesh Patil : जालना येथील उद्योगपती संजय सिनगारे यांनी छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्यासह त्यांचे मेहुणे प्रशांत राजेंद्र वाघ व अन्य दोन जणांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, सदरची तक्रार धादांत खोटी व बनावट असून त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या कंपनीशी खासदार उन्मेश पाटील यांचा संबंध काय, असा सवाल कंपनीचे संचालक प्रशांत वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.
प्रशांत वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “मी व प्रमोद जाधव आम्ही श्रीनिवासा प्रोटीन्स प्रा.लि. कंपनीचे संचालक आहोत. वास्तविक संजय सिनगारे यांनी या कंपनीत त्यांच्या आधीच्या कंपनीचा अनुभव असल्याने सोयीस्कर रित्या परस्पर पैसे काढून घेतल्याची तक्रार आम्ही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जानेवारी 2024 रोजी दाखल केलेली आहे. परंतु, खासदार उन्मेश पाटील यांचा कोणलाही काडीमात्र संबंध नसतांना चाळीसगाव येथील स्थानिक मोठया लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या तोंडावर सिनगारे परिवाराला हाताशी धरून राजकीय षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. फाजील प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीवर आरोप लावणे हा स्टंट बाजीचा प्रकार असून लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अशा सर्रास गैर तक्रारी या निवडणुकांच्या पाश्वर्वभूमीवर होता आहेत. याच घाणेरड्या राजकीय उद्देशाने खासदार उन्मेश पाटील यांचे नाव तक्रारीत घेण्यात आले असून यांचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेला माहीत आहे.”
“वास्तविक संजय सिनगारे परिवाराला या व्यवसायातला अनुभव असल्याने कंपनीचे सर्व व्यवस्थापन, व्यवहार त्यांच्याकडे दिलेले होते. त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून आमची फसवणूक केली आहे. कंपनीच्या खात्यातून परस्पर विविध कंपनीच्या नावाने खोटी बिले सादर करून पैसे वळते केले. तसेच श्रीनिवासा कंपनीत तयार झालेला माल त्यांच्या बालाजी उद्योग या कंपनीच्या नावाखाली परस्पर विकून ते पैसे स्वतः कडे ठेवून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असता ही बाब उघड झाली. या अफरातफरीबाबत आम्ही संचालकांनी त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या. त्यांनी बँकेला देखील खोटे स्टॉक स्टेटमेंट सादर करून बँकेची देखील फसवणूक केली. संबंधित बँकेने त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या त्या नोटिसांना त्यांनी कुठले उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जानेवारी 2024 रीतसर तक्रार दिलेली आहे. शिंगारे परिवाराने श्रीनिवासा प्रोटीन्स कंपनीतून वेगवेगळ्या माध्यमाद्वारे 18 कोटी 50 लाख (साडे अठरा कोटी) रुपये काढून घेतले. याची त्यांनी आम्हाला साक्षांकित लेखी कबुली दिली आहे. उलटपक्षी आमची श्रीनिवासा प्रोटीन्समध्ये सुमारे 11 कोटी (अकरा कोटी) रुपयाची गुंतवणूक अडकली आहे. वास्तविक बघता सिनगारे परिवाराचे सर्व उद्योगधंदे दिवाळखोरीत निघालेले आले आहेत. व्यापाऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झाल्याने अनेक व्यापाऱ्यांची त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे. उलट या चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” असेही प्रशांत वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.