जळगावचे खासदार उन्मेश पाटील संसदेत टॉप 7
MP Unmesh Patil : कार्यक्षेत्रातील विविध लोकाभिमूख उपक्रम तसेच सोशल मीडिया व मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्टच्या आधारावर दिल्लीच्या नामांकित पॉलिटिकल ॲनॅलिसिस अँड रिसर्च कमिटीकडून देशभरातील खासदारांचे मूल्यमापन करण्यात आले होते. त्याद्वारे जाहीर झालेल्या संसदपटू लोकप्रियता निर्देशांकात जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांना टॉप 7 रँकींग प्राप्त झाले आहे.
लोकसभा सचिवालयाच्या पुढाकारातून यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेत लोकसभेतील सहभाग, विविध प्रस्तावांवर झालेली चर्चा आणि वेळोवेळी मांडलेले प्रश्न, या सर्व कामगिरीच्या आधारावर नव्याने निवडून आलेल्या 290 खासदारांमध्ये जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांना संसदीय लोकप्रियता निर्देशांकात 10 व्या क्रमांकाचे रँकींग मिळाले होते. यंदाच्या पॉलिटिकल ॲनॅलिसिस अँड रिसर्च कमिटीने केलेल्या सर्व्हेच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या योजनांची माहिती, अमंलबजावणीसाठी विविध उपक्रम राबवित लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे खासदार उन्मेश पाटील यांची कामगिरी उंचावली आहे. त्यांना संसदपटू लोकप्रियता निर्देशांकात सातव्या क्रमांकाचे रँकिंग यावेळी मिळाले आहे.
संसदेतील कामगिरीचे मूल्यमापन करताना खासदार उन्मेश पाटील यांनी घेतलेल्या राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सक्रियता, केंद्र सरकारच्या योजनांना दिलेले प्रोत्साहन आणि त्यासाठी घेतलेली शिबिरे व केलेले प्रयत्न, स्थानिक क्षेत्र विकास कामांमध्ये घेतलेली आघाडी, सामाजिक कार्यात व त्या कार्यातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली धडपड, केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांमधून शेवटच्या घटकांपर्यंत केलेली कामे, सामाजिक कार्यक्रमांमधून व सभांमधून घेतलेला उत्साहपूर्ण सहभाग, पक्षाच्या ध्येय धोरणाचा राजकीय प्रचार व प्रसार करताना वेळोवेळी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मांडलेली भूमिका, आदी घटकांचा विचार करून खासदार उन्मेश पाटील यांच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत राहिला. त्यांना देशातील सर्व खासदारांच्या तुलनेत सातव्या क्रमांकावर येण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.