“जळगावच्या पान टपरीवाल्याला पुन्हा पान टपरीवर बसवायची वेळ आली आहे”

खासदार संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर डागली तोफ

Jalgaon Today : “महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी गद्दारी या जळगाव जिल्ह्यात झाली होती. 250 खोके घेणारे आज घरात बसून आमचे भाषण ऐकत बसले आहेत. एका पान टपरीवाल्याला बाळासाहेब ठाकरे यांनी थेट आमदार आणि मंत्री केले होते, त्यांना आज पुन्हा पान टपरीवर बसवायची वेळ आली आहे”, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज येथे जाहीर सभेतून केली.

काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तसेच मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीच्या रावेर आणि जळगाव लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी बुधवारी (ता.24) अर्ज दाखल केले. त्यापार्श्वभूमीवर जळगाव शहरात आयोजित जाहीर सभेत खासदार श्री.राऊत बोलत होते. सभेच्या ठिकाणी भाषण करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर नामोल्लेख न करता थेट निशाणा साधला. तसेच भारतीय जनता पार्टीवर देखील टीकास्त्र सोडले.

यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेश पाटील, लोकसभेचे जळगावमधील उमेदवार करण पाटील, रावेरमधील उमेदवार श्रीराम पाटील, जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, गुलाबराव वाघ, वैशाली सूर्यवंशी, सुनील महाजन आदी उपस्थित होते. कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा शिवसेना ठाकरे गट, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांतर्फे काढण्यात आली. त्यात जिल्हाभरातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामाध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button