खुशखबर…पुढील तीन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता !

जळगाव टुडे । मॉन्सूनची अरबी समुद्रातील वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागांत त्याने प्रगती केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मॉन्सून साधारण ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे. त्यानंतरच मॉन्सून महाराष्ट्रासह अन्य राज्यांकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळे आगामी तीन दिवसात कशा वेगवान घडमोडी घडतात, त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ( Monsoon Update)

हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह लक्षद्वीप बेटांवर मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान देखील निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेसह अंदमान बेट समूह मॉन्सूनने व्यापला होता. त्यानंतर उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने गेल्या रविवारी मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात प्रगती केली. त्यात २४ मे पासून अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.

मात्र, अरबी समुद्रातून थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चांगल्या पावसाच्या भाकिताने मॉन्सूनच्या स्वागताची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमूह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे रोजीच मॉन्सूनचे आगमन झाले आहे. आता तो केरळमध्ये कधी दाखल होतो, त्याकडे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button