मॉन्सून केरळमध्ये यंदा एक दिवस अगोदर 31 मे रोजीच दाखल होण्याचे संकेत !
जळगाव टुडे । नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या म्हणजेच मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान तयार झाले आहे. रविवारपर्यंत (ता.19) मॉन्सून अंदमान निकोबार बेट समूहावर तसेच 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल ही स्पष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Monsoon Update)
ईशान्य हिंद महासागरात वरच्या थरात वाहणारे वारे, वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरात खालच्या थरात वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीलगतचा हवेचा दाब, हे सहा घटक विचारात घेऊन मॉन्सूनचे केरळातील आगमनाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. सुदैवाने सध्या प्रशांत महासागरात असलेली एल-निनो स्थिती निवळू लागली आहे. मात्र, मॉन्सून हंगामात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. गेल्या वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन आठ दिवस उशिराने म्हणजेच 08 जून रोजी झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत (11 जून रोजी) मॉन्सून तळ कोकणात पोचला होता. यंदा मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.