शेतकऱ्यांसाठी खूशखबर…मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल, या तारखेला होणार दाखल
जळगाव टुडे । दरवर्षीच्या पावसाळ्यात केरळमध्ये एक जूनच्या जवळपास मॉन्सून दाखल होत असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकतो आणि 15 जुलैच्या दरम्यान तो संपूर्ण देशभरात पोहोचतो. दरम्यान, यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार मॉन्सून कधी दाखल होईल, त्याकडे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Monsoon Update)
यंदा 19 मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी देखील तो 19 मे रोजी दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. मात्र, त्याचे आगमन लांबल्याने 08 जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून 11 जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोचला होता. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा सुमारे 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने जाहीर केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून रविवारी (ता.19 मे) त्याची पहिली हजेरी दक्षिण अंदमानचा समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि दक्षिण निकोबार बेटांमध्ये लावेल. त्यानंतर मॉन्सून 21 मेपर्यंत पोर्टब्लेअरमध्ये हजेरी लावतो. त्याआधी त्याची दमदार हजेरी दक्षिण अंदमानच्या समुद्रात लागते. या वर्षी रविवारी मॉन्सून अंदमान समुद्रात दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. दरवर्षी 22 मे रोजी मॉन्सून या भागात पोहोचतो, मात्र यंदा तो तीन दिवस आधीच दाखल होणार आहे.