अखेर महाराष्ट्रात मॉन्सून दाखल…तळ कोकणात पावसाची लागली हजेरी !
जळगाव टुडे | ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो मॉन्सून एकदाचा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्याने तळ कोकणात हजेरी देखील लावली असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मॉन्सूनच्या आगमनाची बातमी पुणे येथील हवामान शास्त्र विभागानेही जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यातील बऱ्याच भागात कालपासून मॉन्सूनची हजेरी लागत आहे. (Monsoon News)
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता होती. याशिवाय पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. प्रत्यक्षात गुरूवारी कोकणातील सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीसह मुंबईच्या उपनगरांमध्ये सकाळीच पावसाची हजेरी लागली आहे. पुणे येथील हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी पावसाच्या आगमनाची बातमी देणारे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पावसाची हजेरी लागली आहे.