यंदा ऑगस्टनंतर भरपूर पाऊस, अतिवृष्टीची शक्यता; शेतकऱ्यांसाठी चांगले वर्ष !
जळगाव टुडे । बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. मात्र, जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल तर सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातीचे दोन महिने सामान्य पाऊस राहणार असून, ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची वाट पाहतात. अखेर ही घटमांडणी आज शनिवारी (ता.11) सकाळी करण्यात आली. (Monsoon News)
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचे भाकीत असेही म्हणतात. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही यंदाची घट मांडणी करण्यात आली. यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आले. यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, तर खरीप पिके साधारण राहतील. याशिवाय रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भेंडवळच्या भविष्यवाणीनसार, यंदा राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहणार आहेत. करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल. पिकांची नासाडी देखील होईल. रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगले राहील, असेही भाकित वर्तवण्यात आले आहे.