पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार; जळगाव जिल्ह्याचाही समावेश
जळगाव टुडे | गोवा किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यानंतर महाराष्ट्रातही पुढील पाच ते सहा दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांचाही त्यात समावेश असून, सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. (Monsoon Alert)
राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून, कोकण किनारपट्टीपर्यंत त्याने धडक दिली आहे. पुढील काही दिवसात मॉन्सून राज्याच्या इतर जिल्ह्यात पोहोचण्याची चिन्हे असताना, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला तसेच विदर्भासह मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दरम्यान, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करण्याची सल्ला कृषी विभागाने कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी बरीच मजल मारली आहे. मात्र, शुक्रवारी मॉन्सूनच्या वाटचालीत फार प्रगती झाली नव्हती. दोन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे, असे आता हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होत असताना, वातावरणातील उकाडा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसाचे कमाल तापमान सुद्धा कायम आहे.