Girish Mahajan : गिरणा नदीतील जलसमाधी आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांनी म्हटले नौटंकी..!
Girish Mahajan : नार-पार योजनेच्या अंमलबजावणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीत कालपासून अर्धनग्न जलसमाधी आंदोलनास सुरूवात झाली आहे. गिरणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतरही आंदोलक मागे हटलेले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार उन्मेश पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. दरम्यान, भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सदर आंदोलनाला नौटंकी संबोधून आंदोलकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.
Girish Mahajan: Minister Girish Mahajan called the Jalasamadhi movement in Girna river a gimmick..!
नार-पार योजनेसाठी गिरणा पट्ट्यातील शेतकरी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे. जोपर्यंत नार-पार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत गिरणा नदी पात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी अग्निशमक दलाची तुकडी तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आले आहे. मेहुणबारे पोलिस या आंदोलनावर नजर ठेवून आहेत.
मंत्री महाजनांनी माजी खासदार उन्मेश पाटलांवर साधला निशाणा
गिरणा नार-पारचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतरही सदरचा प्रकल्प येणार नाही, असा गैरसमज पसरविला जात आहे. त्यासाठी गिरणा नदीत सुरू असलेले अर्धनग्न जलसमाधी आंदोलन हा देखील नौटंकीचा भाग आहे, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता.२५) लखपती दीदी मेळाव्यासाठी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी मंत्री महाजन आले होते. त्याठिकाणी प्रसार माध्यमांनी त्यांना गिरणा नदीच्या पात्रात सध्या सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनाविषयी छेडले. तेव्हा त्यांनी आंदोलनला नौटंकीची उपमा देऊन माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.