नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा !
न्यायालयाने १० लाखांचा दंडही ठोठावला
जळगाव टुडे । नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना सुमारे २३ वर्षे जुन्या मानहानीच्या एका खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवत पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना दंडापोटी तब्बल १० लाख रुपये समोरच्या व्यक्तीला देण्याचेही आदेश दिले आहेत. सोमवारी शिक्षा सुनावताना पाटकर यांचे वय व प्रकृती लक्षात घेऊन त्यांना एक किंवा दोन वर्षांची कमाल शिक्षा दिलेली नाही, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. ( Medha Patkar )
दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्या विरोधात सदरचा खटला दाखल केला होता. त्या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने श्रीमती पाटकर यांना दोषी ठरवले आहे. सन २००० मध्ये विनय सक्सेना यांनी पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाविरुद्ध एक जाहिरात प्रकाशित केली होती, जेव्हा मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलनाद्वारे धरणास विरोध केला होता. सक्सेना हे नॅशनल कौन्सिल ऑफ सिव्हिल लिबर्टीजचे अध्यक्ष होते. पाटकर यांनी सक्सेना यांच्या विरोधात त्यावेळी प्रसिद्धी पत्रक काढले होते. त्यामाध्यमातून त्यांनी सक्सेना हे गुजरातच्या नागरिक आणि राज्याच्या संसाधनांना बिल गेट्स व वोल्फेन्सन समोर गहाण ठेवत आहेत आणि ते गुजरात सरकारचे एजंट आहेत, असा आरोप केला होता. त्यामुळे आपली मानहानी झाल्याचा दावा विनय सक्सेना यांनी न्यायालयात दाखल केला होता. तब्बल २३ वर्षानंतर न्यायालयाने निकाल देताना मेधा पाटकर यांना पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.