मराठा आंदोलक एकवटले…राज्यातील भाजपच्या लोकसभा उमेदवारांना पळता भूई थोडी झाली !
Jalgaon Today : मराठा आरक्षणाचा विषय मार्गी न लावल्याच्या कारणावरून राज्यातील भाजपसह महायुतीच्या बऱ्याच लोकसभा उमेदवारांना आंदोलकांच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही मराठा आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावातून पिटाळून लावल्याची घटना घडली आहे. राज्यातील भाजपच्या बऱ्याच लोकसभा उमेदवारांना मराठा आंदोलकांच्या रोषामुळे पळता भूई थोडी झाली असून, भाजपच्या गोटात परिणामी चिंतेचे वातावरण पसरले आहे (Maratha Andolan)
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या आंदोलकांच्या तीव्र रोषाचा सर्वाधिक फटका भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे तसेच पंकजा मुंडे, अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण, प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांना आतापर्यंत बसला आहे. संबंधितांचा ताफा अडवून त्यांच्यासमोर ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा बाजी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पिसादेवी येथे आयोजित सभेच्या ठिकाणी मराठ्यांनी बहिष्कार टाकल्याने बऱ्याच खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसून आले होते.
पंकजा मुंडे यांच्याही नाकात आला दम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संतापलेल्या आंदोलकांनी पंकजा मुंडे यांनाही सोडले नाही. त्यांना माजलगाव तालुक्यातील लऊळ या गावी घेराव घालण्यात आला होता. तसेच बीड लोकसभेतील पंकजा मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणे यांचा कारखाना असणाऱ्या केज तालुक्यातील औरंगपूर गावातही पंकजा मुंडे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. शिरुर तालुक्यातील खालापूरी गावात देखील पंकजा यांच्या गाड्याचा ताफा अडविण्यात आला होता. याशिवाय प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांनाही आंदोलक कार्यकर्त्यांनी प्रचार करताना थांबवले होते. भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यसभेवर निवडून आलेले खासदार अशोक चव्हाण यांनाही अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी प्रचार करण्यापासून रोखले होते. त्यांच्या पत्नी अमिता यांना महाळकौठा या गावी मराठा आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते.