मोठी बातमी…मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांची तब्बेत अचानकपणे बिघडली !
छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल
जळगाव टुडे । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा 4 जूनपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वीच जरांगे पाटील यांची तब्बेत अचानकपणे बिघडली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांकडून त्यांना आराम करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना घशाचे इन्फेक्शन झाले असल्याची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच इतरही काही तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा लावून धरण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांनी 04 जून पासून उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे. मात्र, त्या आधीच त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांचा उपोषणाचा निर्णय रद्द होतो की काय, अशी शंका त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. तब्बेत बरी झाल्यानंतर ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात करतात किंवा नाही, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची 08 जून रोजी नारायण गडावर देखील सभा होणार होती. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट असून, पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. तसेच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकत्र येणाऱ्या मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी नारायण गडावरील सभा आधीच रद्द करण्यात आली आहे.