मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांवर हल्ल्याचा डाव ?

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

जळगाव टुडे । “भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुकुमशहा असून, माझा प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबियांवर हल्ल्याचा डाव रचला जात आहे,” असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून केला आहे. त्यांच्या त्या आरोपाने राज्यभर एकच खळबळ उडाली असून, उद्या सोमवारी (ता.13) होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता देखील व्यक्त होते आहे.

“भावनिक करुन मला मागे सरकवण्याचा काम होत आहे. माझ्या बलिदानाने गृहमंत्र्यांचे समाधान होत असेल तर मी बलिदान द्यायला आणि जेलमध्ये जायला देखील तयार आहे,” असेही जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हटले आहे. ”मी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे. यापुढे मी धनगर, मुस्लीम यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या जाती एकत्र आल्या तर आपला सुपडा साफ होईल, अशी भीती काहींना वाटते. माझा प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहे”, असाही दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

”मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीस हे कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नसते. मराठा समाज हा भाजपच्या विरोधात कधीच नव्हता. मराठा समाजानेच भाजपला राजसत्तेवर बसवले. पण त्याच राजसत्तेवरून बसून गृहखात्याचा गैरवापर केला जात आहे. मराठ्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. एसआयटी नेमून त्रास दिला जात आहे,” असाही आरोप जरांगे पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button