‘जामनेरच्या 15 रुपयांचा पट्टा घालणाऱ्याला मी नीट केले आहे’, जरांगे पाटलांचा मंत्री महाजनांना टोला !
जळगाव टुडे । “लोकसभेच्या निवडणुकीत यांना असे पाडा की त्यांच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका ही शेवटची संधी आहे,” असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एका सभेतून दिला आहे. तसेच जामनेरच्या 15 रुपयांचा पट्टा घालणाऱ्याला मी नीट केले आहे, असाही टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील आष्टीजवळील अंबोरा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना त्यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तसेच गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. प्रसंगी चंद्रकांत पाटील यांचा तेरे नाम आणि मंत्री महाजन यांचा 15 रूपयांचा पट्टा घालणारा, असा खळबळजनक नामोल्लेख त्यांनी केला. “भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता. मात्र, आमच्या माय लेकीचे डोके त्यांनी फोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गोधड्या घेवून महाराष्ट्रात मुक्कामी आहेत. मी कोणालाही निवडून द्या म्हटलेले नाही,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
“मराठा समाज ताकतीने एकत्र आला आहे. त्याचीच धास्ती देशाने घेतली आहे. त्यांना मराठ्यांच्या एकीची भीती एवढी वाटते आहे की चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टप्प्यात निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. हाच मराठ्यांचा विजय आहे,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.