अखेर मनोज जरांगे यांनी मागितली एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांची माफी
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आई-बहिणीवरून अपशब्द वापरले होते. जरांगे यांच्या त्या शब्दांचे सगळीकडे तीव्र पडसाद देखील उमटले होते. सरकारनेही त्यांच्यावर कठोर कारवाईची भूमिका घेतली होती. त्यामुळे धास्तावलेल्या मनोज जरांगे यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली
मनोज जरांगे यांच्या विधानाचे मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करत मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे. मी आई – बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो. आमच्यासाठी आई -बहिणींहून काहीच मोठे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालवणारे आहोत. त्यामुळे आमच्या तोंडातून आई-बहिणीविषयी चुकीचे शब्द गेले असतील तर मी 100 टक्के शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो, असे जरांगे म्हणाले.