महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन
पार्थिव माटुंगा पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार
Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज शुक्रवारी पहाटे 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने अतिदक्षता विभागात पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोहर जोशी यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल व दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती. शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते. सन 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती.