चाळीसगाव तालुक्यातील सन 2021 मधील महापूरग्रस्तांना 6 कोटी 38 लाखांची मदत

जीवित व पशुधन हानी, घरांच्या पडझडीची मिळणार नुकसान भरपाई

Mangesh Chavan : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट 2021 मध्ये अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीाचा मोठा फटका जनतेला बसला होता. सप्टेंबर 2021 महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. त्यामुळे पाटणादेवी अभयारण्य क्षेत्र व गिरणा, मन्याड धरण क्षेत्रात एका रात्रीत सुमारे 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी प्रचंड नुकसान सोसणाऱ्या महापूरग्रस्तांसाठी शासनाने सुमारे 6 कोटी 38 लाखांची मदत जाहीर केली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार चाळीसगाव तालुक्यात सन 2021 च्या महापुरात 2660 जनावरांचा मृत्यू, 11231 कोंबड्या, 2250 घरे व व्यावसायिक दुकानांचे अंशत व पूर्णतः नुकसान झाले होते. याशिवाय सुमारे 15800 हेक्टरवरील जमिनी व पिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली होती. अचानकपणे आलेल्या महापुरामुळे घरे, जनावरे, गोठाशेड वाहून गेली होती तसेच अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने मोठी वित्तहानी झाली होती. ग्रामीण भागात नदी किनारी असणारी शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली होती. शेतकऱ्यांची हजारो छोटी- मोठी जनावरे मृत्युमुखी पडली होती. नदी किनाऱ्यावरील संपूर्ण घरेच वाहून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला होता.

या महापूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरूच होता. त्यांच्या त्या प्रयत्नांना अखेर यश आले असून नुकताच राज्य शासनाच्या वतीने अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. त्यानुसार चाळीसगाव मतदारसंघासाठी 6 कोटी 38 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या चाळीसगाव तालुक्यातील महापूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी राज्य शासनाचे व महापूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना मदत मिळवून देणारे चाळीसगाव मतदारसंघाचे संवेदनशील आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

प्रत्येक संकटात चाळीसगाव वासीयांच्या सोबत : आमदार मंगेश चव्हाण
ऑगस्ट 2021 मध्ये मध्यरात्री झालेल्या महापुरामुळे मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी महापूरग्रस्त प्रत्येक गावाला भेट देऊन पंचनामे केले होते. तसेच ज्यांची घरे वाहून गेली होती त्यांना तात्पुरती घरे देखील स्वखर्चाने उभारून दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. याबाबत माझ्या पाठपुराव्याला यश आले असून जीवितहानी, पशुधन हानी, घर, गोठा, संसारोपयोगी साहित्य, अशी वित्तहानी झालेल्या महापूरग्रस्तांना 6 कोटी 38 लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच सदरची मदत लाभार्थींच्या खात्यात जमा केली जाईल. सदरची मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानतो, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button