आधी एक रुपयात पिकविमासारखी यशस्वी योजना, आता कापूस भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रतिपादन
Jalgaon Today : “प्रधानमंत्री पिकविमा योजनेचे कवच शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींनी दिले. पूर्वी शेतकऱ्यांना काही रक्कम हिस्सा म्हणून भरावी लागत होती, आता एक रुपयात पिकविमा योजनेचा लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांचा हिस्सा देखील राज्य शासन भरत आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना ३०० कोटींचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी ७६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून लवकरच उर्वरित पिकविमा रक्कम जमा होईल. आधी एक रुपयात पिकविमासारखी यशस्वी योजना व आता कापूस भावांतर योजनेमुळे निश्चितपणे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा आधार मिळू शकणार आहे”, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी येथे केले.
महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ व रावेर लोकसभेच्या उमेदवार श्रीमती रक्षा खडसे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य महारॅली काढण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह महायुतीचे आमदार, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भव्य अशी नामांकन सभा संपन्न झाली. प्रसंगी सर्वांनी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा रेकॉर्डब्रेक बहुमताने विजयी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प देखील व्यक्त केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार मंगेश चव्हाण बोलत होते.
महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची महत्वाची घोषणा केली. त्यासाठी अर्थसंकल्पात ४००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल, असे त्यांनी आश्वस्त केले. याशिवाय जिल्ह्यातील पाडळसरे व इतर सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस निधी तरतूद केली असल्याचे जाहीर केले आहे. खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नमूद केले.