चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण करणार सर्वसामान्य घरातील मुलींचे कन्यादान
भव्यदिव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे लवकरच आयोजन
Mangesh Chavan : चाळीसगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून बचत गटातील तसेच सर्वसामान्य घरातील मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी घेत आहे. त्याकरीता येत्या तीन महिन्यात भव्यदिव्य असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.
चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर शिवजयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बचत गट CRP तसेच VO सन्मान शक्तीवंदन अभियान व शिवनेरी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू सोहळ्याप्रसंगी आमदार श्री. चव्हाण बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव मतदारसंघात देखील सन 2018/19 मध्ये बोटावर मोजता येतील एवढेच बचत गट अस्तित्वात होते. आज 2024 मध्ये सुमारे 3200 गटांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात 100 कोटींचे बँक भांडवल उलाढाल झाली आहे. ही महिलाशक्तीची ताकद असून रुपयाला रुपया जोडत आपल्या संसाराचा गाढा महिला भगिनी ओढत आहेत, असेही आमदार श्री. चव्हाण म्हणाले.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवयानीताई ठाकरे, अभियंता सेल प्रदेशाध्यक्ष शुभम जयभाये, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा संगीताताई गवळी, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस धनंजय मांडोळे, प्राचार्या साधनाताई निकम, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण, मोहिनी ताई गायकवाड, नमो ताई राठोड, सुलभाताई पवार, विजयाताई, चिराग शेख, अमोल नानकर, अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, मनोज गोसावी, सचिन दायमा, माजी सभापती विजय जाधव, बबलू चव्हाण, बबन पवार, अविनाश नाना चौधरी, लोखंडे ताई, हरीश शिवरकर, सतीश पाटील, गोपाल पाटील, निलेश तेलंगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बचत गट प्रभाग संघांसाठी इमारतीचे बांधकाम
चाळीसगाव तालुक्यात महिला बचत गटांच्या प्रभाग संघांसाठी मेहुणबारे व देवळी येथे प्रभाग संघ इमारत बांधकाम आमदार निधीतून सुरु झाले आहे. पुढील काळात बहाळ तसेच कळमडू, करगाव, टाकळी प्रचा, रांजणगाव पाटणा, वाघळी. पातोंडा, उंबरखेड, सायगाव या प्रभाग संघांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
दहा हजारांहून अधिक महिलांच्या उपस्थिती खेळ रंगला पैठणीचा
शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या हळदीकुंकू महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील बचत गटांच्या महिलांसाठी विविध बक्षिसे लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आली. त्यात प्रथम बक्षिस म्हणून एक ग्रॅम सोन्याच्या तीन नथा, तीन पैठण्या, तीन मिक्सर भाग्यवान विजेत्यांना देण्यात आले. सदर कार्यक्रमाला 10 हजारहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दिली. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते क्रांती नाना मुळेगावकर यांनी न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिला माता-भगिनींचे मनोरंजन केले. तसेच चांगल्या पद्धतीने सहभागी होणाऱ्या महिलांना बक्षीस देखील दिली. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हळदीकुंकू महोत्सव साजरा होत असल्याने महिलांनी देखील या महोत्सवाचा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेत शिवनेरी फाउंडेशनचे कौतुक केले. प्रत्येक महिलेला शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आली. सुंदर अशा नियोजनाबद्दल उपस्थित महिलांनी शिवनेरी फाउंडेशनेचे आभार मानले.
यावेळी स्मिताताई वाघ यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतूक करत आजपर्यंत ते जळगाव जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सौ. प्रतिभाताई यांनी देखील महिलांसाठी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करून तसेच त्याला भारतीय जनता पक्षाच्या शक्ती वंदन अभियानाची जोड देत एक पाऊल पुढेच टाकल्याचे सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, महिला पुढे गेली तर घर पुढे जाते हा मोदीजींचा विचार आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात महिलांना दिशा दिली. उज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरात गॅस आल्याने धुळीपासून मुक्ती झाली. बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक सशक्त झाल्या. राज्य शासनाच्या नमो महिला सशक्तीकरण योजनेमुळे बचत गटांना बळकटी मिळाली आहे. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरणाला गती मिळाली आल्याचे त्यांनी सांगितले.