“बेलगंगा साखर कारखाना विकणाऱ्यांच्या घरापुढे बेशरमाचे झाड लावणारे आज स्वतःच्या स्वार्थासाठी बेशरम झाले”

चाळीसगावच्या मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांची घणाघाती टीका

Mangesh Chavan | “चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना विकणाऱ्यांच्या घरापुढे बेशरमाचे झाड लावण्याच्या गोष्टी करणारे आज स्वार्थासाठी बेशरमासारखे त्यांच्याच घरी गेले आहेत. ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात संघर्ष उभा केला, प्रसंगी केसेस अंगावर घेतल्या तसेच रात्रीचा दिवस एक केला, त्याच घराणेशाहीच्या दारी त्यांनी आता लोटांगण घातले आहे. हे जनतेला अजिबात आवडलेले नसून, त्यांच्या स्वार्थी वृत्तीची सर्वांना किळस वाटत आहे. अशा प्रवृत्तीला गाडण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे,” अशी जोरदार टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरात भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, रयत क्रांती यांच्या महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी आमदार श्री. चव्हाण बोलत होते. “यंदाची लोकसभा निवडणूक ही गल्लीची नाही तर दिल्लीची सत्ता कुणाच्या हातात असावी, ते ठरवणारी असल्याने जनता कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी व अबकी बार ४०० पार हा आकडा पार करण्यासाठी जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी राहील. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावच्या उमेदवार स्मिताताई वाघ या विक्रमी मताधिक्याने लोकसभेत जातील. त्यात योगदान म्हणून चाळीसगाव तालुक्यातून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्मिताताई यांना एक लाखांचे मताधिक्य मिळवून देऊ, असा निर्धार देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

म्हणे गुजरात राज्यात जाणारे पाणी अडवू नये म्हणून तिकीट कापले

“चाळीसगाव तालुका भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या तालुक्याने अनेक नेतृत्व जिल्ह्याल व राज्याला दिले. पक्षात अनेक चढउतार आले तरी त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र ज्यांना अवघ्या १० वर्षात आमदारकी आणि खासदारकी मिळाली, जे आठ दिवसांपूर्वी पक्षाला आई म्हणत होते त्यांनी पक्षाने एक संधी नाकारताच आईसारख्या पक्षाशी बेईमानी केली. असे व्यक्ती कोणत्याही विचारधारेशी किंवा पक्षाशी एकनिष्ठ नसतात, उलट समाजासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी घातक असतात,” अशीही टीका आमदार चव्हाण यांनी केली.

“सध्या गिरणा नदीवरील बलून बंधारे, नार पार नदीजोडच्या नावाने दिशाभूल केली जात आहे. गुजरातला जाणारे पाणी अडवू नये म्हणून तिकीट कापले, असा जावई शोध काही मंडळीना तिकीट कापल्यानंतर लागला आहे. मात्र ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात हे गेले त्यांनी महाविकास आघाडी असताना २४ महिन्यात साधी बलून बंधाऱ्याना पर्यावरण मान्यता दिली नाही. मग याचं खरच गिरणा मायवर प्रेम आहे का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

त्यांना पाच वर्षात तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सोडवता आला नाही

गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांना पहिली प्रशासकीय मान्यता गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री असताना २८ डिसेंबर २०१८ रोजी देण्यात आली होती. ७० वर्षात नार पार आणि गिरणा नदीजोड प्रकल्पाचे साधे अंदाजपत्रक सुद्धा कुठल्या सरकारने केल नव्हते, ते अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ६ एप्रिल २०१८ म्हणजे बरोबर आजच्या सहा वर्षांपूर्वी ऐतिहासिक शासन निर्णय घेतला होता. वरखेडे धरणाचा केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत गिरीश महाजन यांच्यामुळे समावेश झाला. ५०० कोटी निधी मिळून पाच वर्षात काम पूर्ण झाले. मात्र, ते काम मी केले म्हणून दुसऱ्यांकडून श्रेय घेतले जाते. त्यांना पाच वर्षात साधा तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवता आला नाही, नाहीतर आज गिरणेवर पाणी अडले असते. हे सर्व सिंचन प्रकल्प केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीनेच होऊ शकतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर खान्देशाला सिंचन सुबत्ता आणण्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमताने निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठेही गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने व एकनिष्ठपणे १३ मे मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देऊन काम करावे, असेही आवाहन यावेळी आमदार चव्हाण यांनी केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button