“स्मिताताई वाघ आतापर्यंतच्या सर्वात जास्त जनसंपर्क असणाऱ्या खासदार असतील”- आ.मंगेश चव्हाण

Mangesh Chavan : “लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने स्मिताताई वाघ यांच्यासारखा अफाट जनसंपर्क असलेल्या महिला उमेदवाराला यावेळी प्रथमच संधी दिली आहे. कदाचित स्मिताताई ह्या जळगावमधील आतापर्यंतच्या सर्वात जास्त जनसंपर्क असणाऱ्या पहिल्या खासदार असतील,” असे प्रतिपादन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी येथील विस्तृत बैठकीत केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवारी (ता.30) दुपारी विस्तृत बैठकीचे आयोजन ब्राम्हण सभेत करण्यात आले होते. त्यात पक्षाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार श्री. चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, गोपाळ भंगाळे, रामचंद्र पाटील तसेच जळगाव तालुकाध्यक्ष ॲड.हर्षल चौधरी व उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लालचंद पाटील, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, माजी शिक्षण सभापती कमलाकर रोटे, माजी पं.स.सभापती मनोरमा पाटील, माजी जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे, मनोहर पाटील, संजय भोळे, सुनील नारखेडे, किशोर नारखेडे, आरपीआयचे अनिल अडकमोल आदी उपस्थित होते.

स्मिताताईंच्या रूपाने एक हक्काचा खासदार आपल्याला यावेळी लाभणार

“स्मिताताई वाघ यांच्यासारखा असा चेहरा यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून मिळाला आहे, ज्यांना जिल्ह्यातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. जिल्हा परिषदेसह विधान परिषदेवर आपल्या कार्याचा ठसा उमटविल्यानंतर त्या आता लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीत स्मिताताई वाघ ह्या नेहमीच पक्षाचे पदाधिकारी तसेच सामान्य कार्यकर्त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या रूपाने एक हक्काचा खासदार आपल्याला यावेळी लाभणार आहे. स्मिताताई वाघ जनतेच्या मनातील खासदार आहेतच, त्यांच्या विजयाची वाट आणखी सोपी करण्यासाठी प्रत्येकाने एक एक मताचे गणित लावायचे आहे आणि प्रत्येक बूथमध्ये आतापासूनच सूक्ष्म नियोजन करायचे आहे,” असेही आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button