चाळीसगावच्या आमदारांसह 30 शेतकऱ्यांना तब्बल 12 दिवस जेलमध्ये ठेवले होते डांबून
वीज वितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलनाला तीन वर्ष झाली पूर्ण
Mangesh Chavan : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला बरोबर तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आमदार व आंदोलकांना तब्बल 12 दिवस तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जेलमध्ये डांबले होते, तरीही आंदोलक डगमगले नव्हते. विशेष म्हणजे शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आल्यानंतर डोक्याचे केस काढून सर्वांनी तत्कालिन सरकारचे तेरावे देखील घातले होते.
शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून जगविलेली हिरवी पिके जळताहेत आणि मुक्या प्राण्यांना प्यायला पाणी नाही म्हणून शेतीपंपांची वीज बंद करू नका, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चाळीसगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तीन वर्षांपूर्वी तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण तसेच 30 शेतकऱ्यांना पोलिसांकडून त्यामुळे जेलमध्येही टाकण्यात आले होते. कष्टकरी शेतकऱ्यांची कुटुंबापासून तसेच शेती व गुरा-ढोरांपासून तब्बल 12 दिवस ताटातूट झाली होती. शेतकऱ्यांची व कष्टकऱ्यांची हाय चांगली नसते, बेलगंगा हे चाळीसगाव तालुक्यातील त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. शेतीपंपांची वीज कट करू नका म्हणून आंदोलन केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण आणि आंदोलक शेतकऱ्यांना त्यावेळी खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, त्यांच्या आंदोलनाची दखल पूर्ण राज्याला घ्यावी लागली होती. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने करत तत्कालिन सरकारचा तीव्र निषेध केला होता. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. सदरचे आंदोलन म्हणजे चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात व जनतेच्या मनात सुवर्णक्षराने लिहिले गेलेले पान आहे, त्यांचा संघर्ष चाळीसगाव तालुका कधीच विसरणार नाही, असे जनसामान्यांतून बोलले जात आहे.