पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने खासदार उन्मेश पाटील नाराज…काय म्हणाले बघा आमदार मंगेश चव्हाण ?
Mangesh Chavan : “भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्याबद्दल मतदारांमध्ये याआधीही खूप मोठी सहानुभूती होती, आता देखील आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी स्वतः त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि ते देखील पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरविले आहे, त्यानुसार स्मिताताईंना एकट्या चाळीसगाव तालुक्यातून सुमारे एक लाखांचा लीड देणार आहोत तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून तब्बल पाच लाख मतांचा लीड देणार आहोत,” असे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.
पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने जळगावचे खासदार उन्मेश पाटील आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, त्याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारणा केल्यावर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण बोलत होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेतली आहे त्याबद्दल काय सांगाल असे विचारल्यावर आमदार श्री. चव्हाण म्हणाले, की “जबाबदारी घेतली आहे म्हणजे भाजपामध्ये माझी काय आणि कार्यकर्त्यांची काय सगळ्यांची तेवढीच जबाबदारी असते. आमच्याकडे जेवढी जबाबदारी नेत्याची असते, तेवढीच बूथ प्रमुखाची पण असते. नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. गिरीशभाऊ राज्यभर पाहतात, जळगाव जिल्ह्यातील काही भागात मला जास्त लक्ष घालावे लागेल. स्मिताताईंना महिला म्हणून फिरायला थोड्या मर्यादा आल्या तरी पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्यासोबत आहे, ते सगळे कामाला लागतील. स्व.उदय बापू यांच्या कार्यकाळापासूनची कार्यकर्त्यांची फळी आहे, ते देखील आता जोमाने काम करतील.”
पक्ष विरोधी कोणी भूमिका घेत असेल तर…पक्ष योग्यवेळी बरोबर निर्णय घेईल
भाजपामध्ये खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर काही नाराजी आहे का असे विचारण्यात आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले, की “पक्षाचा तो निर्णय आहे. पार्टी उद्या उठून मलाही सांगू शकते आता काही काळ तुम्ही आराम करा, पक्षाची सेवा करा. असे अनेक लोक आहेत त्यांना थोडे थांबवले, पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. ज्यांना तिकीट नाकारले त्यांनाच तिकीट देण्याची भूमिका कालांतराने घेण्यात आली. हा पक्ष वेगळ्या पद्धतीने काम करतो. सगळ्यांच्या बाबतीत तीच भूमिका आहे. उन्मेश पाटील यांचे तिकीट नाकारले असे म्हणण्याला कारण नाही. पक्षाच्या डोक्यात त्यांना भविष्यात खूप मोठी संधी देण्याचा विचार असू शकतो. त्यामुळे सकारात्मक विचार केला पाहिजे. मीडिया काय म्हणतो ते काय माहिती नाही, मात्र ते स्वतः नाराज नाहीत. त्यांनी मनापासून स्वीकारले आहे. त्याच्यामुळे आपण वेगळा अर्थ काढण्याची अजिबात गरज नाही. उन्मेशदादा खूप समाधानी आहेत, ते पक्षाला आई समजतात. त्यानुसार आम्ही सगळेजण आईची सेवा करण्याचे ठरविले आहे. पक्ष विरोधी कोणी भूमिका घेत असेल तर ते पक्ष बघत असेल आणि योग्यवेळी पक्ष बरोबर निर्णय घेईल.”