जळगावच्या पहिल्या महिला खासदार बनविण्यासाठी स्मिताताई वाघ यांना विजयी करा- आमदार मंगेश चव्हाण
Mangesh Chavan : लोकसभेचा जळगाव मतदारसंघ हा सुमारे 35 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच स्मिताताई वाघ यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलेला उमेदवारी देऊन भाजपाने नवा पायंडा पाडला आहे. मतदार बंधू व भगिनी यांनीही जळगावच्या पहिल्या महिला खासदार बनविण्यासाठी स्मिताताई वाघ यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी समाज माध्यमातून केले आहे.
जळगावच्या लोकसभा मतदारसंघात स्मिताताई वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाजाच्या विविध घटकांनी भारतीय जनता पार्टीच्या क्रांतिकारी निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पर्यायाने भाजपाच्या विचारधारेशी जुळलेल्या स्मिताताई वाघ यांनी यापूर्वी जळगावच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय महाराष्ट्र विधान परिषदेच्या त्या आमदार राहिल्या आहेत. त्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास अतिशय थक्क करणारा असा राहिला आहे. स्मिताताईंची आजपर्यंतची कारकीर्द लक्षात घेता जळगाव जिल्हा परिषदेसह विधान परिषदेत त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. अभ्यासू वृत्तीने अनेक प्रश्नांची सोडवणूक करून तळागाळातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर स्मिताताई जळगाव जिल्ह्यातील शेतीसह सिंचनाचे प्रलंबित प्रश्न निश्चितच पोटतिडकीने मांडतील, त्यांची सोडवणूक होईपर्यंत मागे हटणार नाहीत, यात तिळमात्र शंका नाही. बी.ए. (मानसशास्त्र) ची पदवी संपादन केलेल्या स्मिताताईंनी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले होते, आंदोलनांमध्येही त्या सहभागी होत्या. त्यामुळे युवक वर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांची त्यांना चांगल्याप्रकारे जाण देखील आहे. महिलांसाठी तर त्या कायम झटत आल्या आहेत, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.
ग्रामविकासात स्मिताताई वाघ यांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही
स्मिताताई वाघ यांनी अमळनेर तालु्क्यातील डांगर बुद्रुक सारख्या गावातून सक्रीय राजकारणाची सुरूवात केली होती. सन 2002 ते 2015 या कालावधीत सलग तीनवेळा त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. त्यांची धडाडी वृत्ती व वेगळी कार्यशैली पाहुनच भारतीय जनता पार्टीने त्यांना जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सोपविले होते. त्या पदावर कार्यरत असतानाही स्मिताताईंनी पंचायतराज व्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला होता. ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून जास्तीतजास्त निधी मिळावा म्हणून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. महिला सरपंच व सदस्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी तालुकानिहाय मेळाव्यांचे आयोजन देखील केले होते. त्यांच्या रूपाने जळगावला प्रथमच एक अभ्यासू महिला खासदार यावेळी मिळणार आहे. त्याचा विचार करून मतदारांनी लोकसभेच्या 13 मे 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत 100 टक्के मतदानाचा संकल्प करून स्मिताताई वाघ यांनाच विजयी करावे, असेही आवाहन आमदार श्री. चव्हाण यांनी समाज माध्यमावर केले आहे.