चाळीसगाव येथे अद्ययावत कृषी भवनाच्या बांधकामासाठी सुमारे 11.69 कोटी रूपये निधी मंजूर
आमदार मंगेश चव्हाण यांची तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा दमदार कामगिरी
Mangesh Chavan : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या विकासकामांचा झंझावात सुरूच ठेवला असून, अनेक अशक्य असणारी विकासकामे मंजूर करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त कृषी भवन बांधकामासाठीही त्यांनी सुमारे 11 कोटी 69 लाख रूपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे.
चाळीसगाव येथील कृषी भवन बांधकामासाठी सुमारे 11 कोटी 69 लाख रूपयांचा निधी त्यांनी मंजूर केल्याबाबतचा शासन निर्णय देखील प्रकाशित झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, चार मंडळ कृषी अधिकारी कार्यालये आणि तालुका बीजगुणन केंद्र यांचे कार्यालय एका छताखाली येऊ शकणार आहे. सदर कृषी भवन मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
कृषी भवन हे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार : आमदार मंगेश चव्हाण
“चाळीसगाव तालुक्यातील कृषी विभागाची कार्यालये विखुरलेली होती. तालुकास्तरावरील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असणे, कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक होते. कृषी विभागाचा लोकसंपर्क लक्षात घेता विविध विभाग विखुरले गेल्याने प्रशासकीयदृष्ट्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते सोईचे नव्हते. शिवाय कार्यरत असलेल्या कार्यालयांसाठी मोठया प्रमाणावर परीरक्षणा पोटी निधी दयावा लागत असल्याने खर्चही वाढत जातो. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याने, एकाच छताखाली अद्ययावत कृषी संकुल बांधणे आवश्यक होते. त्यामुळे चाळीसगाव येथील प्रस्तावित मंजूर कृषी भवन निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी व प्रशासकीय दृष्टीने फायदेशीर ठरेल. तसेच ते आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरेल,” असा विश्वास चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.