चाळीसगावमध्ये 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय एका फटक्यात मंजूर, आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा

आरटीओ कार्यालयानंतर पाच दिवसातच महायुती सरकारची आरोग्यदायी भेट

Mangesh Chavan : चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव, धुळे किंवा छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे सध्याच्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून अखेर चाळीसगावात 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर झाले आहे.

चाळीसगावच्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यासाठी संयुक्तिक असा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला न गेल्याने गेली अनेक वर्षे सदरच्या मागणीला मूर्त स्वरूप आले नव्हते. मात्र, राज्यात महायुती सरकार आल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती दिली. विविध विकासकामे व प्रकल्प यांच्या प्रलंबित फाईली युद्धपातळीवर शासनाकडून मंजूर होऊ लागल्या. त्याचाच एक भाग म्हणून 07 मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते झाले होते. राज्यात तब्बल 13 वर्षांनंतर मंजूर झालेले हे पहिले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने त्याची राज्यात चर्चा झाली होती. या उद्घाटन समारंभातच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीचे संकेत दिले होते. त्यानुसार अवघ्या पाच दिवसातच मंगळवारी (ता.12) चाळीसगाव येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याचा जीआर निघाला. त्यामुळे चाळीसगाव वासीयांना महायुती सरकारकडून डबल गिफ्ट मिळाले आहे.

चाळीसगाव वासीयांच्या सेवेत अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय दाखल होणार
“चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील लोकसंख्या व भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका असूनही तेथे आवश्यक त्या प्रशासकीय व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. छोट्या छोट्या कारणांसाठी आपल्याला 100 किमी जळगाव येथे जाण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. त्यामुळे चाळीसगावकरांचा वेळ, श्रम, पैशांचा एकप्रकारे अपव्ययच होत होता. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक प्रमुख प्रशासकीय कार्यालये, इमारती चाळीसगाव येथे मंजूर केल्या आहेत. त्यात आता 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मोठी भर पडली आहे. यामुळे गोर गरीब रुग्णांना चाळीसगाव येथेच उपचार मिळतील. केवळ मंजुरी मिळून मी थांबणार नसून उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारत बांधकामासाठी बिलाखेड शिवारात शासकीय जागेची देखील मागणी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त उपजिल्हा रुग्णालय चाळीसगाव वासीयांच्या सेवेत दाखल होईल. सदर उपजिल्हा रुग्णालय मंजुरी दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आरोग्य सेवा संचालनालय संचालक, सहसंचालक, उपसंचालक यांचे मनापासून आभार मानतो,” असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

30 खाटांवरून 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय…राज्यातील दुर्मिळ उदाहरण
राज्यात उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसाठी काही निकष व अटी राज्य शासनाने घातल्या आहेत. त्यात इतर जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील अंतर, रुग्णसंख्या आदी बाबी विचारात घेतल्या जातात. त्यानंतर आधी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले जाते. चाळीसगाव ते जळगाव अंतर, जिल्ह्यातील मोठा तालुका असल्याने तसेच प्रसूतीमध्ये देखील तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक असल्याने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटांवरून थेट 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याची मागणी स्वतः आमदार श्री. चव्हाण यांनी शासनाकडे केली होती. केवळ मागणी करूनच ते थांबले नाहीत तर त्याबाबतचा आवश्यक तो प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यात वेळोवेळी आलेल्या त्रुटी दूर केल्या. तसेच 50 ऐवजी 100 खाटा कशा योग्य आहेत, हे शासनाला पटवून दिले. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटावरून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील अशा प्रकारे श्रेणीवर्धन झालेले उपजिल्हा रुग्णालयाचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले कौशल्य वापरून ही मंजुरी मिळवली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button