ममुराबादला अक्षय्य तृतीयेनिमित्त मरीमातेच्या बारागाड्यांचा कार्यक्रम उत्साहात !
जळगाव टुडे । तालुक्यातील ममुराबाद येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त शुक्रवारी (ता.10) मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडला. गणेश अमृत पवार या भक्ताने बारागाड्या ओढण्याचा नवस फेडला. बारागाड्या पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय यावेळी लोटला होता. ( Mamurabad News)
ममुराबाद गावात असलेल्या मरीमातेच्या मंदिरावर पोळा सणासह अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मानलेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. पैकी आखाजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला नवसाच्या बारागाड्या मोठ्या भक्तीभावाने ओढल्या जातात. आसोदा रस्त्यापासून ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या पाहण्यासाठी स्थानिक व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित देखील असतात. यंदाही आखाजीनिमित्त गणेश पवार या भक्ताने बारागाड्या ओढून मानलेला नवस फेडला. गोपाल मोरे, मधुकर भिल्ल, मुरलीधर पाटील, चावदस चौधरी, राजू पाटील, सुरेश बोरसे, सुधाकर सोनवणे आदी भक्त मंडळींना सहकार्य केले. स्थानिक पोलिस पाटील तसेच तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला. कोणताही अनुचित प्रकार त्यामुळे घडला नाही.