भाजप निकालात फेरफार करू शकते, अनेक ‘ईव्हीएम’ मशिन गायब !
Jalgaon Today : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यास लागलेला विलंब आणि अनेक ईव्हीएम गहाळ झाल्याचे लक्षात घेता भाजप निकालात फेरफार करू शकते, अशी भीती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. तसेच मतदानाच्या टक्केवारीत अचानक झालेली वाढ त्रासदायकच नाही तर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण करते, असेही त्यांनी म्हटले आहे. (Mamta Banarjee)
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर, दुसऱ्या टप्प्यात 88 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते. विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यांनी दोन्ही टप्प्यातील अंतिम आकडेवारीच्या विलंबावर निवडणूक आयोगासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की, सामान्यतः हा डेटा मतदानानंतर 24 तासांच्या आत जारी केला जातो. मात्र यावेळी तो बराच उशीरा प्रदर्शित झाला आहे.
कोणत्याही ‘व्होट टर्नआउट’ ॲपवर मतदानाची टक्केवारी लगेच पाहता येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. प्रत्यक्षात आकडेवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आणि काही जागांवर दोन दिवसांत अपडेट करण्यात आली. मतदानाची टक्केवारी 7 वाजेपर्यंत बूथवरून मिळालेल्या आकडेवारीवर आधारित असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, अनेक केंद्रांवर 6 वाजेनंतरही मतदान सुरूच होते, असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले आहे.