Mahavikas Aghadi : दोन्ही गुलाबरावांनी झांज वाजवल्यानंतर शिंदेसेनेच्या बसल्या कानठळ्या…!
धरणगावातील कावड यात्रेतून दिला एकजुटीचा संदेश
Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात मोठा बेबनाव असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून झाला होता. प्रत्यक्षात माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी धरणगावातील कावड यात्रेत सहभागी होत मोठ्या जोशात झांज वाजवल्याने शिंदेसेनेच्या तर कानठळ्याच बसल्या. दोन्ही नेत्यांनी कावड यात्रेच्या माध्यमातून समस्त धरणगावकरांची मने जिंकून एकजुटीचा संदेश सुद्धा दिला.
Mahavikas Aghadi : Both Gulabraos played the cymbals and set the ears of Shindesena…a message of unity from Kavad Yatra…!
धरणगाव शहरातील भोले सरकार मित्र मंडळाच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तापी नदीच्या निर्मळ पाण्याने भरलेल्या सुमारे २५१ जल कलशांची भव्य दिव्य मिरवणूक यानिमित्याने वाजत गाजत काढण्यात आली होती. सार्जेश्वर महादेवावर जलाभिषेक केल्यानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. या सर्व धार्मिक कार्यक्रमात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, धरणगाव शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, ज्येष्ठ नेते मोहन नाना, दिलीप अण्णा धनगर, नारायण चौधरी, वैभव बोरसे, अमोल हरपे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी, उद्योजक सुरेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, भाऊसाहेब मराठे, परमेश्वर महाजन, गजानन महाजन, राहुल रोकडे, विनोद रोकडे, संतोष महाजन आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते.
शिंदेसेनेच्या गटात उडाली मोठी खळबळ…!
कावड यात्रेच्या ठिकाणी हजेरी लावून तरूणांचा उत्साह द्विगुणीत करण्याचे कार्य माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमधील एकोपा कायम असून, नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा संदेश दोन्ही गुलाबरावांनी यावेळी दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदेसेनेच्या गटात त्यामुळे मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. धरणगाव शहरातही त्याची दिवसभर चर्चा रंगली होती.