शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या लोकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय !
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर शिंदे सेना व अजित पवार राष्ट्रवादीचे अनेक आमदार स्वगृही परतण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीतही लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे पराभवाचे तोंड पाहावे लागल्यास आपली काही खैर नाही, अशी भीती त्यांना आता वाटू लागली आहे. त्यामुळेच मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे सोडून गेलेले आमदार ठोठावत आहेत. त्यांच्यासाठी खुद्द शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी (ता.15) मोठा निर्णय घेतला. ( Mahavikas Aghadi )
लोकसभेच्या निकालानंतर आज प्रथमच महाविकास आघाडीची एकत्र बैठक मुंबईत पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना ज्येष्ठ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून भाजपसोबत संसार थाटणाऱ्या आमदारांबद्दल थेट भाष्य केले. सोडून गेलेल्या लोकांना तुम्ही पुन्हा पक्षात घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या आणि संघर्ष करणाऱ्यांनाच आम्ही पुढे सोबत घेऊन जाणार आहोत, असे नमूद केले. तसेच आमच्यात मोठा भाऊ आणि लहान भाऊ, असा काही विषय नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
शरद पवारांनी एका शब्दात विषय संपवला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक आमदार तुम्हाला सोडून गेले होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर आता ते तुमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी पुन्हा दरवाजा उघडाल का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांच्यासमोर उपस्थित केला. तेव्हा शरद पवार यांनी त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे एका शब्दात सांगून विषय संपवला.