महाराष्ट्र हादरला….मराठवाड्यासह विदर्भाला जाणवले भूकंपाचे धक्के !
जळगाव टुडे । आज बुधवारची सकाळ महाराष्ट्राला मोठा हादरा देऊन गेली. कारण मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना तसेच विदर्भातील एका जिल्ह्यास भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेडसह हिंगोली, परभणी आणि वाशिम जिल्ह्याचा त्यात समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकजण जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडले. दरम्यान, प्रशासनाने घाबरून न जाण्याचे आवाहन जनतेला केले आहे. ( breaking News )
Breaking News
प्राप्त माहितीनुसार, परभणीसह हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यात तसेच विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानक कंपन निर्माण होऊन घरातील भांड्यांची पडझड सुरू झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले. प्रसंगी झोपेत असलेल्या लोकांनी जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही धास्ती बाळगू नये, असे आवाहन ठिकठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर या गावापासून १३ किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. या भूकंपाची ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.