Maharashtra Politics : भाजपाकडून पुन्हा तीच मोठी चूक; ‘या’ नेत्यावरील टीका विधानसभेच्या निवडणुकीतही भोवणार ?
Maharashtra Politics : लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात जेवढ्या काही सभा घेतल्या होत्या, त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विशेषकरून लक्ष्य केले होते. प्रत्यक्षात पवारांवर झालेली टीका मतदारांना न रूचल्याने जेवढ्या काही ठिकाणी मोदी व शहा यांनी सभा घेतल्या होत्या, त्या जागांवरील भाजपचे बहुतांश उमेदवार पराभूत झाले होते. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागल्यानंतर आताही भाजपकडून पुन्हा तोच कित्ता गिरविला जात असून, भाजप नेते हे शरद पवारांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत.
Maharashtra Politics : Same big mistake from BJP again; Criticism of ‘this’ leader will also face in the assembly elections?
विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उपस्थित महाराष्ट्रातील नेते व पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पहिला निशाणा साधला. त्यांनतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. ‘शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी असून, ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले,’ असा जोरदार हल्ला केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी चढवला. तसेच ‘महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब असून, त्याचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरे आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर सुद्धा टीका केली.
नेमके काय म्हणाले अमित शहा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्यासाठी केलेल्या कामांची आणि निधीची यादी सादर करताना केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना, ‘शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा,’ असेही आव्हान अमित शहा यांनी दिले. तसेच ‘केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपचा दहा वर्षांतील हिशोब देतील,’ असे शहा म्हणाले. ‘राज्यात जेव्हा पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आला. भाजप पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात भाजपची सत्ता हवी,’ असा दावाही शहा यांनी केला.