महायुती फुटीच्या उंबरठ्यावर ? विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता…!
जळगाव टुडे । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच महायुतीसह महविकास आघाडीने सर्वच मतदारसंघांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बसलेला मोठा फटका लक्षात घेता विशेषतः महायुतीच्या घटक पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. खासकरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. ( Maharashtra Politics )
लोकसभेच्या निवडणुकीत भाजप तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी महायुतीच्या माध्यामातून महाविकास आघाडीला आव्हान दिले होते. प्रत्यक्षात महायुतीला मोठी हार पत्करावी लागली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाल्याचा निष्कर्ष संघाच्या मुखपत्राने काढला. तशात भाजपच्या काही नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करून संघाच्या दाव्याला आणखी खतपाणी घातले आहे. अशा या परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत राष्ट्रवादी काँग्रेस आल्याचे बोलले जात आहे.
या कारणामुळे महायुतीत पडू शकते फूट
लोकसभेतील अपयशाचा टीळा कपाळी मिरवून विधानसभा निवडणूक जास्तीच्या जागा मागितल्या तरी आपल्याला त्या मिळणार नाहीत, याचीही भीती राष्ट्रवादीला आहे. कारण, राज्यातील २८८ जागांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागा भाजपच्या खिशात जातील. उर्वरित जागांवर शिवसेना शिंदे गट दावा करेल. अशावेळी आपल्याला जागा मिळतील तरी किती, असा प्रश्न अजित पवार गटाला पडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाशी घरोबा कायम ठेवून विधानसभेची लढण्याच्या मनःस्थितीत भाजप देखील त्यामुळे राहणार नाही. परिणामी, निवडणुकीपूर्वीच महायुतीत उभी फूट पडण्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे.
शरद पवारांकडून फुटीरांना पायघड्या
दरम्यान, मूळ राष्ट्रवादी सोडून अजित पवारांसोबत बाहेर पडलेले बरेच आमदार आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. स्वतः शरद पवारांनी फुटीरांना पुन्हा पक्षात घेण्याचे संकेत दिले आहेत.तसे झाल्यास अजित पवारांसाठी तो मोठा धक्का असेल. दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिलेला आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर अर्थातच अजित पवारांसमोर स्वबळावर लढण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही.