मुस्लीम मतदारांचा आक्रमक पवित्रा; भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा !

जळगाव टुडे । यंदाची लोकसभा निवडणूक ही बऱ्याच कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातल्या त्यात मुस्लीम मतदारांचा आक्रमक पवित्रा यावेळी जास्त प्रभावी ठरला आहे. 100 टक्के मतदानाच्या इराद्याने उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडलेल्या मुस्लिमांचे हे असे अनपेक्षित वर्तन पाहुन बऱ्याच राजकीय पक्षांचे धाबेही दणाणले असून, काहींच्या गोटात तर त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरल्याचे बोलले जात आहे. मुस्लिमांच्या वाढीव मतदानाची काहींनी धास्ती खाल्ली की काय, अशी शंका उपस्थित करण्यास वाव देणारी वक्तव्ये आता संबंधित पक्षांच्या नेत्यांकडूनच केली जात असल्याचेही दिसून आले आहे. (Maharashtra Politics)

राज्यातील मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण लक्षात घेता निवडणुकीत त्याचा प्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला होईल की महायुतीला, हे आताच सांगणे कठीण आहे. कदाचित निवडणूक निकालानंतर त्याविषयी जास्त बोलणे किंवा त्याबद्दल स्पष्टीकरण देणे जास्त संयुक्तिक ठरणार आहे. अर्थात, मुस्लीम मतदारांचा आक्रमक पवित्रा बघता काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने आतापर्यंत त्याबद्दल तोंडातून एक शब्द सुद्धा काढलेला नाही. मात्र, भाजपासह मित्रपक्षांच्या महायुतीच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या मतदानाची धास्ती खाल्ल्याची प्रचिती त्यांनी केलेल्या वक्तव्यांमधून हळूहळू येऊ लागली आहे.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (ता.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचेही भाषण झाले. दरम्यान, मंत्री महाजन यांनी केलेल्या एका वक्तव्याने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे आहे, हे लक्षात येण्यास उपस्थितांना जास्त वेळ देखील लागला नाही. ही निवडणूक जातीपातीची नाही तर नरेंद्र मोदींसाठी आहे. लोकसभा निवडणुकीत एका विशिष्ट समाजाचे लोक 80 ते 90 टक्के मतदान करत आहेत, आपल्या समाजाने देखील अशाच प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून केले. त्याची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button